राणी
तिचं मोठ्ठ कपाळ, धनुष्याच्या कमानीसारख्या भुवया, त्याच धनुष्याच्या दोरीला ताण देऊन मोठ्ठ करावं तेवढे टपोरे डोळे, त्याच धनुष्याला बाण लावावा तसं एकदम टोकदार आणि शेंड्याला फुगीर होणार नाक, तिचे बारीक नाजूक ओठ, निमुळता चेहरा, दोन फिकट लाल पडलेल्या गालावर बारीक-बारीक दोन-तीन तीळ, पाठीवर हेलकावणारी भुरकट रंगाची एकेरी वेणी, उंची पूरी, पुरेपूर स्त्रीत्व ल्यालेली, रंगानं तशी सावळीच,पण बघता क्षणी काळजाची धडधड वाढवणारी राणी.
नेमक्या तारुण्याच्या वयात आई वारली. बापाने दुसरं लग्न केलं, मग काय राणी, राणीच झाली स्वतः च्या मनाची. नातेवाईकांमध्ये कोणी धीर देण्याच्या बहाण्याने जवळीक केली, नंतर त्याने सोडून दिल तेंव्हा राणी उदास झाली. पण काय माहित तिच्या मनाने तिला काय सांगितलं, नवीन-नवीन तिचे प्रेमप्रकरणं चोरून चालायचं पण नंतरची प्रेमप्रकरणे थोडक्यात लफडी खुलेआम व्हायची . आठवडा, पंधरा दिवस, महिना खूप झाला तिचा प्रियकर बदलायला. रस्त्याने, बाजारात, चौकात, अगदी स्वतःच्या घरी येताना सुद्धा तिचा हात कधी प्रियकराच्या हातात, कधी गळ्यात, कधी गाडीवर त्याच्या पाठीवर मान टाकल्यावर मांडीवर असायचा.
बापाने, नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनी, मार,भीती,दम देऊन समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण राणी कधी रडून,कधी गंभीर होऊन सांगायची "त्याने फसवलं मला, तोच माझ्यावर लाईन मारायचा, माझा यात काही दोष नाही, आता परत अशी चूक नाही करणार."
पण तरीही मुलं जसे मुलींना नजर मोठी करून, मान वाकडी, तिरकी, वर, खाली करून बघतात, आणि मुली नजर देऊन खाली मान घालून निघून जातात. तश्यातली तर राणी अजिबात नव्हती, तिला मुलांकडे मुलांच्या नजरेसारखं निरखून पाहण्यात काय मजा वाटायची तीच तिला माहित.
आता राणीसाठी स्थळांची ये-जा सुरु झाली होती, पण तिची प्रचिती ऐकून कोणी होकारही देत नव्हतं, मग तिला स्वयंपाक येतो का? धुनी, भांडी येतात का? ह्या सगळ्या गौण बाबी होत्या. एवढ्या गडबडीतही राणीला गळ्यात हात घालून फिरायला कोणीतरी मिळाला होता. राणीवर आता पाळत ठेवण्यात येत होती, काही वेळी तिला कोंडूनही ठेवण्यात आल.
पण शेवटी राणीच ती एकेदिवशी अचानक गायब झाली. पूर्वी राज्यांना कश्या अनेक राण्या असायच्या, तसे ह्या राणीला अनेक राजा भेटले आणि ती गेली तिचा नवीन राजा शोधायला.
- प्राणा
Comments
Post a Comment