जत्रा
वाऱ्याच्या झुळकेबरोबरच कडक उन्हाच्या अंगाला लागणाऱ्या आणि डोंगरउतारावर डोळ्यांना दिसणाऱ्या झळाया, हिरव्या, पिवळ्या, काळ्या, निळ्या रंगाच्या ताडपत्र्या ठोकून बांधलेली पालं. डोंगराच्या माथ्यापासून तर मंदिराच्या अलीकडं १०० एक फूट जिथं झाडाची सावली भेटलं तिथं तीन दगडाच्या चुली मांडून बोकड कापायच्या रासी लावून जत्रा चालू होत्या. जत्रा खाणाऱ्यांची होती आणि न खाणाऱ्यांची पण होती, पुढं गेलं कि खेळण्याचे, चष्म्याचे, टोप्याचे, कडेवाले, कानातले, बांगड्यांचे दुकान थाटलेली दोन-तीन दिवसापासून जत्रेत धंदा करण्यासाठी आलेले बिना अंघोळीचे, देवाच्या प्रसादावर, वडापाव, भज्यावर दिवस काढणारे व्यावसायिक, तिकडूनच पुढे आकाश पाळणा, रिंगण, लाकडी स्वयंपाक उपयोगी साहित्य या सगळ्याच्या बरोबर बसलेला जत्रेचा मानकरी भैरोबा. "भैरोबाच्या नावानं चांगभलं" च्या घोषाने सर्व जत्रा दुमदुमून गेली होती.
जत्रेत भोळे भक्त, नवसवाले भक्त, डोकं टेकवायला आलेले भक्त, काही नुसतेच याला त्याला बघायला आलेले भक्त पण या सगळ्यात हौसा जरा वेगळीच होती.
भल्या सकाळी उठून घरासमोर सडा सारवन करून घाई गडबडीने आवरून तिची जत्रेला जायची तयारी चालू होती. दोन पोर आणि एक पोरगी देवाच्या पायावर डोकं टेकवून आणायचं असं तीच ठरलं होत ,सोबत जत्रेला आलेली नणंद तिचा नवरा पोर होतीच कि. पाव्हण्या रावळ्यांचं, शेतीचे काम उरकता उरकता दुपार झाली. ऐन उन्हाच्या तडाख्यात हौसा तिचे पोर, नणंद तिचे पोर आणि सगळ्यात पाठीमागून येणारा नंदेचा नवरा पटा-पटा चालत गावाच्या चौकात आले.
सकाळीच "जरा गावातून चक्कर मारून आलो" असं म्हणून बाहेर पडलेला हौसेचा नवरा दारू पिऊन ठरर होऊन चिंचेच्या बुंध्याला टेकून बसला होता. मोठं पोरग १० वर्ष्याचं, लहान ७ आणि पोरगी लहान होती. पोरांनी बापाला पाहिलं तस लहाना बापाकडे जायला निघाला पण मोठ्यांनी त्याला थांबवलं,सगळे येऊन वडापाच्या गाडीपाशी येऊन थांबले. हौसा ने नणंदेला खुणावलं बहीण निघाली भावाकडं तस हौसा चा नवरा आपण दारू पिलोच नाही अशा आवेशात चिंचेच्या खोडाला धरून उभा राहिला, डुलत डुलत घरच्यांच्या जवळ आला. मेव्हण्याला "काय दाजी" म्हणाला, तस दाजी ओळख नसल्यासारखा हसत गाडीच्या पुढच्या बाजूला गेला. हौसा च्या मनात कस नुस झालं आपल्या नवऱ्याला भर चौकात कोणी खिजवत हसून गेलेलं तिला अजिबात आवडलं नाही. हौसा च्या नवऱ्याने भाच्यांच्या आणि पोरांच्या हातात १०-१० रु दिले. बहिणाला म्हणाला "तुला ग जत्रला पैस""मला नको वहिनीला दे "२०० रु दिले, बहीण म्हणाली एवढेच दादा याच्यात काय व्हायच, "तिच्याकडं हायेत पैसं" असं म्हणून त्याने परत चिंचेचा बुंधा गाठला.
गाडी निघाली शेजारच्या गावाला तस पोरांमध्ये तुझी नोट चांगली कि माझी याची शर्यत लागली होती, नोट १० रु ची होती पण इच्छा मात्र आर्धी जत्रा खरेदी करायची होती, जस जस पोरांना काय घ्यायचं हे हौसा ऐकत होती तस तिला दडपण येत होत. २०० रु मध्ये काय काय घेणार. आला देवाचा गाव आला, वेग वेगळ्या खेळण्या पाहून पोर हुरळून गेले. मला jcb, ट्रॅक्टर, जीप घ्यायची असं त्यांच आपापसात सुरु झालं, देवाच्या पाया पडून आलो कि मग घेऊ अस म्हणून हौसा ने पोरांच्या जवळच्या पैशाने पानफूल नारळ घेतलं.
देवापुढे नुसतेच हात जोडले काय मागावं तिला कळत नव्हतं कारण मंदिराच्या बाहेर गेल्यावर पोरांची कशी समजूत काढायची या प्रश्नाचं उत्तर तिला देव हि देऊ शकत नव्हता.मंदिराच्या बाहेर आल्यावर परत पोरांची गडबड सुरु झाली, अगोदर खाऊ घेऊ आणि मग आपण घेऊ म्हणून वेळ टाळून नेली. पावशेर- पावशेर गुडीशेव रेवडी चे पुडके घेतले. नणंद म्हणाली एवढासाच का ग घेतेस,हौसा म्हणाली "अक्का पोर काय १ दिवस खातेत मग ते तसाच पडून राहत ,त्यापेक्षा थोडाच घेतलेलं बर." २०० रु यात ती काय घेणार होती.
खेळणीच दुकान आलं, आता पोरांना धीर धरवत नव्हता. लहान मुलगा म्हणाला मला ट्रक घ्यायचा, किंमत विचारली फक्त ८० रु, किंमत ऐकून आपण आपल्या पोरांना घेऊन देऊ शकत नाही ह्या विचारानेच तिचे डोळे डबडबले होते. मोठा समजूतदार होता त्याने दोघात मिळून एक ट्रॅक्टर घेऊ अस म्हणून लहान्याची समजूत काढली, पोरांना घेऊन हौसा घरी आली .
हौसा ने कधी दारात आलेल्याला रिकाम्या हाताने जाऊ दिल नाही पण स्वतः च्या पोरांना मात्र पाहिजे ते देऊ शकली नाही. जत्रेला नाव देवाचं होत, पण मजा मात्र सगळ्यांनी केली. हौसा ची दररोज जत्रा असते.
.... प्राणा
खेळणीच दुकान आलं, आता पोरांना धीर धरवत नव्हता. लहान मुलगा म्हणाला मला ट्रक घ्यायचा, किंमत विचारली फक्त ८० रु, किंमत ऐकून आपण आपल्या पोरांना घेऊन देऊ शकत नाही ह्या विचारानेच तिचे डोळे डबडबले होते. मोठा समजूतदार होता त्याने दोघात मिळून एक ट्रॅक्टर घेऊ अस म्हणून लहान्याची समजूत काढली, पोरांना घेऊन हौसा घरी आली .
हौसा ने कधी दारात आलेल्याला रिकाम्या हाताने जाऊ दिल नाही पण स्वतः च्या पोरांना मात्र पाहिजे ते देऊ शकली नाही. जत्रेला नाव देवाचं होत, पण मजा मात्र सगळ्यांनी केली. हौसा ची दररोज जत्रा असते.
.... प्राणा
Nice म्हणजे उत्तम कथा
ReplyDeleteधन्यवाद भाऊ
Delete